माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत सर्वेश, श्रेयस, तनिषची विजयी सलामी
Santosh Sakpal
October 04, 2024 05:54 PM
SHIVNER NEWS AGENCY/REPORTER
MUMBAI : सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर शालेय १६ वर्षाखालील मुलांच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलचा सर्वेश परुळेकर, जेजे शताब्दी मुंबई पब्लिक स्कूलचे श्रेयस गायकवाड व तनिष पवार, स्वस्तिक सुर्वे आदींनी सलामीच्या लढती जिंकल्या आणि दुसरी फेरी गाठली. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी नवरात्र महोत्सव मंडळाचे सरचिटणीस भूषण परुळेकर, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, नितीन जाधव, अरुण मोरे आदी उपस्थित होते.
जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड-भायखळा येथे सुरु झालेल्या शालेय कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील सबज्युनियर ६४ खेळाडू सहभागी झाले आहेत. सर्वेश परुळेकरने उद्घाटनीय सामन्यात विजय मिळविताना समर्थ मयेकरचा ११-० असा पराभव केला. श्रेयस गायकवाडने सेंट पीटर हायस्कूलच्या विहान जाधववर ८-३ असा चुरशीचा विजय मिळविला. सेंट जोसेफ हायस्कूलच्या स्वस्तिक सुर्वेने अँन्टोनिया डिसोझा हायस्कूलच्या हर्ष सोळंकीला १४-२ असे तर मुंबई पब्लिक स्कूलच्या तनिष पवारने समर्थ आळवेला १५-० असे हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २४ व्या शालेय कॅरम स्पर्धेचे सातत्य राखत मंडळाने सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी चँम्पियन कॅरम बोर्डावर दर्जेदार स्पर्धेचे पूर्णपणे मोफत आयोजन केले आहे.