मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व तानसा तलाव ओसंडून वाहू लागले
Santosh Gaikwad
July 26, 2023 10:59 PM
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आज (दिनांक २६ जुलै २०२३) मध्यरात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी; तर तानसा तलाव आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात दिनांक २० जुलै २०२३ रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा व विहार हे दोन्ही तलाव देखील आज ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ३ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव वर्ष २०२१ मध्ये १८ जुलै रोजी, वर्ष २०२० मध्ये ५ ऑगस्ट रोजी; तर वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये दिनांक १६ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.
तानसा तलावाचा विचार करता, १४,४९४.६ कोटी लीटर (१४४,९४६ दशलक्ष लीटर) एवढी त्याची कमाल जलधारण क्षमता आहे. हा तलाव गतवर्षी दिनांक १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता, दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता; तर त्याआधीच्या वर्षी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८५,२९५.७ कोटी लीटर (८५२,९५७ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. मुंबई महानगराच्या वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा ५८.९३ टक्के इतका आहे.