मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. यातील तीन जागांवर शिवसेना विरूध्द शिवसेना अशी थेट लढत होत आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध माजी मंत्री, शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर असा सामना हेात आहे. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यात मुख्य लढत होत आहे. या तिन्ही मतदार संघात महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत असली तरीसुध्दा खरा सामना शिंदे विरूध्द ठाकरे असाच रंगणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे भूषण पाटील अशी लढत आहे. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून मविआच्या उमेदवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड विरूध्द महायूतीचे उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे रिंगणात आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदार संघात महायुतीचे मिहिर कोटेचा महाविकास आघाडीचे संजय पाटील रिंगणात आहेत. मुंबईत होणा-या मतदानासाठी मुंबईत २ हजार ५२० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
कल्याण लोकसभेच्या लढाईकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. या निवडणूक रिंगणात तब्बल २८ उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे डॉ श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात खरी लढत होणार आहे. शिंदे यांची पाच लाखाचा लीड मिळेल यासाठी प्रयत्नशील आहेत तर शिंदेंना ठाण्याला परत पाठवून मशाल लोकसभेत पोहचेल असा विश्वास दरेकर यांना आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख १८ हजार ९५८ मतदार आहेत तर एकूण १९६० मतदान केंद्र आहेत.
भिवंडीत तिरंगी लढत होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे (बाळयामामा) तर समाजसेवक निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. कपिल पाटील यांची सीट धोक्यात असून, पाटील यांचा पराभव झाल्यास भाजपला मोठया नामुष्कीला सामोरे जावे लागेल असेच चित्र या मतदार संघात दिसून येतय. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ठाणे लोकसभेत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजन विचारे तर महायुतीकडून शिंदे गटाचे नरेश म्हस्के असा सामना रंगणार आहे.ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. दिवंगत आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. या मतदार संघात शिवसेना विरूध्द शिवसेना अशी लढत होत आहे. ठाण्याचा पराभव शिंदे आणि ठाकरे दोघांसाठी धक्कादायक ठरणार आहे त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
पालघर लोकसभा मतदार संघात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. परंतू खरी लढत महायुतीचे हेमंत विष्णू सावरा आणि ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात होणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने शेवटच्या क्षणी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे तिरंगी सामना होणार आहे.
नाशिक मतदार संघावर सुरूवाताील भाजपने दावा केला होता. मात्र शिवसेना शिंदे गट विरूध्द भाजप अशी जोरदार रस्सीखेच झाली अखेर शिंदे सेनेच्या वाटयाला हा मतदार संघ मिळाला. छगन भुजबळ ही येथून इच्छूक होते. महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे रिंगणात आहेत त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शांतीगिरी महाराजांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत होणार आहे.भाजपने विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात नाशिकच्या कॉंग्रेसच्या आमदार डॉ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना वंचितचा उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांच्यामुळे धोका असून तिरंगी सामना होणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर भगरे हे उमेदवार आहेत.यंदा या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे.
मराठी मतांचे विभाजन निश्चितच ?
मुंबईत अनेक भागात मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत. अनेक मतदारसंघात मराठी मतं निर्णायक सुद्धा ठरतात. मुंबईत सहा पैकी तीन लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. या तीन मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण या दोन चिन्हांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. यामुळे या मतदारसंघांमध्ये मराठी मतांचं विभाजन होईल असेच चित्र आहे. तर इतर दोन मतदारसंघांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार अशी थेट लढत आहे. यामुळे सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यातही वंचित बहुजन आघाडीने ही स्वतंत्र उमेदवार दिल्याने अल्पसंख्याकांच्या मतांचं विभाजनही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये होईल असं स्पष्ट आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांत मराठी मतांचं विभाजन निश्चित समजलं जात आहे.
राज ठाकरेंचा पाठींब्याचा किती फायदा
मुंबईत मराठी अस्मितेसाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी मराठीच्या मुद्यावरच आंदोलनं केली आणि पक्षचा विस्तार केला.त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करताना हीच भूमिका घेतली आणि त्यांना सुरुवातीला मराठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईत काँग्रेसची पारंपरिक मराठी मतं सोडली तर एकगठ्ठा मराठी मतं ही शिवसेनेला मिळत आल्याचं दिसतं. मनसे हा पक्ष आल्यानंतर मराठी मतांचं विभाजन होताना दिसलं. यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. त्यामुळे राज यांच्या पाठींब्याचा महायुतीला किती फायदा हेातो हेच पाहावे लागणार आहे.
-------------
अशी होणार लढत :
दक्षिण मुंबई : अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)
दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
उत्तर पश्चिम मुंबई : अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)
उत्तर मुंबई : पियूष गोयल (भाजपा) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
उत्तर मध्य मुंबई : उज्ज्वल निकम (भाजपा) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
ईशान्य मुंबई : मिहीर कोटेचा (भाजपा) विरुद्ध संजय दिना पाटील (ठाकरे गट)
ठाणे : नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)
कल्याण : श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)
भिवंडी : कपिल पाटील (भाजपा) विरुद्ध सुरेश म्हात्रे (मविआ) विरुद्ध निलेश सांबरे (अपक्ष)
पालघर : डॉ. हेमंत सावरा (भाजपा) विरुद्ध भारती कामडी (ठाकरे गट) विरुद्ध राजेश पाटील (बहूजन विकास आघाडी)
नाशिक : हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) विरुद्ध शांतीगिरी महाराज (अपक्ष)
दिंडोरी : डॉ. भारती पवार (भाजपा) विरुद्ध भास्कर भगरे (मविआ)
धुळे : डॉ. सुभाष भामरे (भाजपा) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस)
-----------------------